मुंबई: मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात उद्या १६ जून या दिवशी मराठा मूक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापुरात होणाऱ्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. आंबेडकर यांनी यापूर्वीच खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आघाडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.'
खासदार संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळायला हवे अशी भूमिका घेतली आहे. या भेटीदरम्यान मला बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाहीत?, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले होते.