परळी दि.१५(प्रतिनिधी)-परळीत गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे. कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातून जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना दि.१४ रोजी घडल्या आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. आता तर चोरट्यांना कशाची चोरी करावी याचे भान राहिल्याचेही दिसत नाही.परळी बसस्थानकात कंडक्टर जवळील तिकीटाची मशिनच चोरट्याने चोरुन नेली असल्याचे पुढे आले आहे.
या बाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसवाहक (कंडक्टर) रामभाऊ आत्माराम बदाले हे दि.१४ रोजी गंगाखेड-परळी बसला कर्तव्यावर होते.बस क्र. एम एच ६ ७८६० बसस्थानकावर उभी होती. बस घेऊन जात असताना तिकीट मशिन क्र.जीकेडी ५०९६ किंमत १५००० रुपये गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ह.मुजमुले हे करीत आहेत.