Advertisement

मोबाईल पाठोपाठ आता दुचाकी चोऱ्यांच्या घटनात वाढ  

प्रजापत्र | Monday, 14/06/2021
बातमी शेअर करा

 परळी-बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना ताज्या असताना आता सोमवारी (दि.१४) तीन मोटारसायकलची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.अनलाॅकनंतर बाजारात गर्दी जमली आणि भुरट्या चोरांनी डोके वर काढल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

 

                  कालच्या गाड्या फोडाफोडीच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी आठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.दि.१४ रोजी दुपारी १२ वा.पर्यंत पाच नागरिक मोबाईल चोरीची फिर्याद घेऊन शहर पोलिसांकडे आले होते.बाजारात पोलीस असताना ही जवळपास पाच जणांच्या मोबाईलवर डल्ला अज्ञात चोरट्यांनी मारला असून भुरट्या चोरट्यांना गजाआड करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

 

यात शहर पोलिस ठाणे, संभाजी नगर पोलीस ठाणे, सिरसाळा पोलीस ठाण्यात मोटारसायकलीही चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये नितीन अर्जुनराव बांगर (रा.नाथनगर परळी) यांची मोटारसायकल अज्ञात चोरांनी हॅण्डललाॅक तोडून चोरली आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर भागातील रहिवासी परमेश्वर बाबु सानप यांची पॅशन प्रो मोटारसायकल चोरीला गेली आहे.सिरसाळा पोलीस ठाण्यात ही भागवत शिवाजी कदम यांनी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.  

 

Advertisement

Advertisement