लातूर दि.१४ जून – एका महाविद्यालयीन तरुणीने व्हिडीओ शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूरमधून समोर आली आहे. या व्हिडीओतून तरुणीने जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही, असे म्हणत आत्महत्या केली आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध घेतला जात आहे. सोबतच मोबाईलमध्ये आणखी काही आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
सोनू शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत सोनू ही लातूरमधील एका महाविद्यालयात बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. शिक्षण घेतानाच ती पार्टटाईम जॉबही करत होती. आता हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये.
आयुष्याच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकणार नाही. मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी अधून- मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी. कारण मी गेल्यानंतर तीचे जगण खूप मुश्किल होणार आहे, असे तिने व्हिडीओत म्हटले आहे.
सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होत. त्यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होते. त्यातूनच सोनूने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते. याबाबत लातूर पोलीस तपास करत आहेत.