सातारा : कोणाचेही आरक्षण काढून घेऊ नका, पण मराठा समाजावर अन्याय करू नका. सामान्य लोकांना पक्षीय राजकारणाशी काही देणे घेणे नाही उद्रेक झाला तर याला राजकारणी कारणीभूत असतील, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. यांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य शासनाला चांगलेच धारेवर धरले.
ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारच्या कोलांट्या उड्या बघून मी माझी पुढची भूमिका ठरवणार आहे. राज्य सरकारने भूमिका मांडल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन असं सांगून राज्य सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
त्यांनी म्हटलं की, गायकवाड समितीच्या अहवालाचे योग्य पद्धतीने वाचन झाले नाही. कोरोनामुळे लोक शांत आहेत. मराठा आरक्षणावर मी भूमिका मांडायला वेळ लागला नाही, असंही ते म्हणाले.
उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते आहे. मात्र त्यांचे आचार अमलात आणले जात नाहीत. सध्या सुरू असलेल्या गोष्टींमुळे मन दुःखी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत नाही. लोकांना हात जोडून विनंती करतो कोणत्याही विचाराला बळी पडू नका, असं उदयनराजे म्हणाले.