गेवराई-पंजाबहून तामिळनाडूकडे तंबाखू व गुटखा घेऊन जाणारा एक ट्रक पाडळसिंगी टोलनाक्यावर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी व गेवराई पोलिसांनी पकडला. ट्रकमध्ये १६० गुटख्यांचे बॉक्स आणि तब्बल १८० पोते तंबाखू आढळून आली. पोलिसांनी एकूण ८ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालकाला अटक केली आहे.
सध्या कोरोना प्रतिबंधक निर्बंध लागू असल्याने जागोजागी पोलिसांच्या चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री एक ट्रक ( के.ए.14 सी 2513 ) पाडळसिंगी टोल नाक्यावर थांबला. यावेळी चेकपोस्टवरील उपविभागीय पोलीस अधिकारी व गेवराई पोलिसांनी संशयावरून ट्रकची तपासणी केली. यावेळी त्यात मोठ्याप्रमाणात गुटखा आणि तंबाखू आढळून आला. यानंतर चालकाला अटक करून पोलिसांनी ट्रक गेवराई पोलीस स्थानकात नेला. बुधवारी ट्रकमधील तंबाखू आणि गुटख्याची मोजणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये प्रत्येकी ३० किलोचे १८० तंबाखूचे पोते व तब्बल १६० गुटख्याचे बॉक्स आढळून आले. ही कारवाई पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, सपोनि प्रफुल्ल साबळे, पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी केली. चालक संदिप बारीकरमाने यास अटक करण्यात आली आहे.