Advertisement

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

प्रजापत्र | Sunday, 23/05/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.२३ (प्रतिनिधी)-राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने हे लसीकरण स्थगित ठेवावे लागले आहे. हे लसीकरण पुन्हा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी आज महत्त्वाची माहिती दिली.

 
देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसीकरणात दोन कोटींचा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. लसीकरणात महाराष्ट्र सर्वात पुढे असला तरी लससाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. उपलब्ध लससाठा कमी असल्याने तूर्त राज्यात दुसरा डोस आणि ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास प्राधान्य दिलं जात आहे. या लसीकरणात खंड पडू नये म्हणून तूर्त १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण पूर्णपणे स्थगित ठेवण्यात आले आहे. असे असताना आज संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी लसीकरणावर भाष्य केले.

 

केंद्र सरकारने १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यास आम्ही सक्षम आहोत. राज्यात या वयोगटात साधारण ६ कोटी नागरिक असून त्यासाठी जे १२ कोटी डोस लागणार आहेत ते एकरकमी खरेदी करण्याची आपली तयारी आहे. मात्र सध्या आपल्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. जी माहिती माझ्याकडे आली आहे त्यानुसार जूनपर्यंत उत्पादन क्षमता वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लसपुरवठा सुरळीत होईल व त्यानंतर युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात येईल. मुबलक लससाठा उपलब्ध होताच राज्यात २४ तास लसीकरण करण्याची आमची तयारी आहे, असे महत्त्वाचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. १८ वर्षांखालील मुलांवरील लसचीही सध्या चाचणी सुरू आहे. या मुलांना कोणती लस द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय झाल्यावर केंद्राकडून सूचना येतील. या सूचना येताच या मुलांचेही लसीकरण तातडीने हाती घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

Advertisement

Advertisement