मुंबई- कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तौते चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकू लागलं आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून १२० किमी अंतरावर समुद्रात असून, याचा प्रचंड फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गनंतर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये वादळाच्या तडाख्यात सापडणाऱ्या भागांतून तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.
केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी १५ किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे