मुंबई-आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून आजचा सामना रद्द झाला असून यापुढच्या सामन्यांवर देखील टांगती तलवार आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आली आहे’, असं एएनआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा अॅड झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी मायदेशी परतले आहेत. त्यानंतर घरच्यांना कोरोनाची लागण झाल्याने आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील कोरोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.