Advertisement

बीडच्या प्रत्येक कोविड सेंटरला पालिकेची सेवा-डॉ.क्षीरसागर

प्रजापत्र | Monday, 12/04/2021
बातमी शेअर करा

 बीड-गेल्या मार्च महिन्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि बघता बघता बीड शहरात मोठी रुग्ण वाढ सुरू झाली. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी शासनाने अन्य कोविड सेंटर उघडण्याची सूचना दिली. या सेंटरमध्ये ज्या सुविधा लागतात त्या सुविधा देण्याचे काम नगरपालिकेने आपल्या स्वखर्चातून केले असून गेल्या एक वर्षापासून बीड शहरात उभारण्यात आलेल्या प्रत्येक सेंटरमध्ये गाद्या, बेडशीट, चादर, विद्युत पुरवठा यासह अन्य साहित्याची सेवा बीड नगरपालिकेने पुरवली असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.

 

       मार्च २०२० ला कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, जिल्हा रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था अपुरी पडू लागली तेव्हा शासनाने कोविड सेन्टर उभारून त्या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या. बीडमध्ये जी जी सेन्टर उघडण्यात आली त्या ठिकाणी बीड नगर पालिकेने शहरात खंडेश्वरी भागात पॉलिटेक्निक कॉलेज, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज आणि आय.टी.आय. बॉईज हॉस्टेल येथील सेंटरवर ७००  रुग्णांसाठी पुढाकार घेत तेथे बेड, गाद्या, उशा, बेडशीट, टेबल, खुर्च्या, स्वच्छता, साहित्य, निर्जंतुकीकरण यासह अन्य सुविधा देण्याची भूमिका पार पाडली. या सर्व सुविधा पालिकेने स्वखर्चाने पुरवल्या आहेत. तसेच यासाठी न.प. चे कर्मचारी सेंटरवर दिवसरात्र काम करत आहेत. शहरात कंटेन्मेंट झोन करण्यासाठी पत्रे, बांबू व साहित्य पुरवले जाते. कोविड बाबत जनजागृतीसाठी न.प. ने स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे, तसेच आतापर्यंत 2900 लिटर सोडियम हायपोक्लोराईड फवारणी केली आहे. यासाठी शासनाकडून अद्यापही कुठलाही निधी देण्यात आला नाही. अल्प उत्पन्न असलेली बीड नगर पालिका नागरी सुविधा पुरवताना मोठी कसरत करत आहे.

 

कर्मचारी, कामगारांना पगार देखील देणे मुस्किल झाले आहे, कोविड सेंटरची व्यवस्था करण्यातच लाखोंचा  निधी खर्च होत आहे. गेल्या वर्ष भरापासून पालिकेने ही जवाबदारी पार पाडली आहे. आता रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे, शासनाने पालिकेला यासाठी वाढीव निधी दिला तर आणखी सुविधा उपलब्ध करून कर्मचार्‍यांना मासिक वेतन देण्याची व्यवस्था करता येईल. कोविड काळात सफाई कर्मचार्‍यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरात दिवसरात्र काम केले आहे. नागरी सुविधा देण्यासाठी प्रत्येक कर्मचारी मनापासून काम करतो आहे. अशा वेळी शासनानेही निधी उपलब्ध करून द्यावा असेही नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement