धाराशिव : दर तीन वर्षांनी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता पिकांच्या दराचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्ह्यात ऊस आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असताना, या पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ऊस दरातील कथित तफावतीच्या मुद्द्यावरून ढोकी येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे उत्तर मागितले आहे.
यासाठी ढोकी गावात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटील, कैलास पाटील, प्रविण स्वामी आणि तानाजी सावंत यांचे फोटो असलेले डिजिटल पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरद्वारे धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर साखर पट्ट्यांच्या तुलनेत कमी दर का मिळतो, असा सवाल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी लोकप्रतिनिधींना दिलेल्या पत्रात सांगितले आहे की, सांगली-कोल्हापूर या साखर पट्ट्यातील ऊस दर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस दरामध्ये कायम सात-आठशे रुपयांचा फरक राहतो, असा त्यांचा दावा आहे. ऊस दरातील या तफावतीमुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे शोषण’ असा विषय देण्यात आलेल्या या निवेदनात, ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऊस दरातील तफावत आणि कारखानदारांकडून होणारे कथित शोषण हा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दुष्काळ, उत्पादन खर्चातील वाढ आणि पिकांना मिळणारा दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत, ऊस दराच्या प्रश्नावर आता लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी ढोकीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
या निवेदनावर सुधाकर उत्तरेश्वर पाटील, दत्ता साधू कोकाटे, दत्तात्रय चंदरराव देशमुख, गोरोबा चंदरराव डांगे पाटील, सुरेश आत्माराम समुद्रे, उत्तमरावसाहेब वाकुरे, विठ्ठल श्रीरंग कोकाटे, चांदपाशा मिया वस्ताद, शामराव छगनराव देशमुख, गोविंद लक्ष्मण समुद्रे, संजय रंगनाथ लंगडे, विवेकानंद अशोक कस्तुरे, आतेफ अ. रऊफ काजी, बाळासाहेब भगवान कोकाटे, अर्जुन मुरलीधर लंगडे, व्यंकटेश पांडुरंग वाकुरे, अबरार सज्जाद शेख, अमर पांडुरंग पाटील, साहेब विठ्ठलराव देशमुख, बाबू गणपती कोकाटे, अब्बास नुनिरोद्दीन काजी, धर्मा सदाशिव काळे, विलास मोहनराव देशमुख आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

