Advertisement

मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट!

प्रजापत्र | Thursday, 27/08/2026
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात २६ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सध्या विभागात कुठेही पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पिकांना गरज असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचा लहरीपणा, मान्सूनचा बदललेला पॅटर्न, अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड यासह खत आणि बियाणांतील भेसळीमुळे शेती आतबट्ट्याचा व्यवसाय बनला आहे.

विभागात सुमारे १०० मि.मी. पावसाची तूट असल्याने भीषण टंचाईच्या दिशेने मराठवाडा चालला असून कमी पावसामुळे टंचाई आराखड्याचे काम दोन महिन्यांपूर्वीच सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी यंत्रणेला दिल्या. त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील खरीप हंगाम आणि पावसाचा आढावा जिल्हानिहाय दौरा करून घेतला. बीड, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. परतीच्या पावसावरच आता सर्व काही अवलंबून असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. आतापर्यंत सरासरी ४७६.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३७६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ३८८ मि.मी., जालना ४०१ मि.मी., बीड २७८ मि.मी., लातूर २८६ मि.मी., धाराशिव २९८ मि.मी., नांदेड ५१३ मि.मी., परभणी ३५७ मि.मी. आणि हिंगोली जिल्ह्यात ४७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement