मुंबई - राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शालेय शिक्षण विभाग तसेच रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या तपासणीनंतर दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा करार करण्यात आला. सामंजस्य करारानुसार राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्प अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्य करणार असून वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहील. दृष्टीदोष असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही ही संस्था घेणार आहे.या कराराचा कालावधी ३६ महिन्यांचा राहणार आहे. या कालावधीत राज्यभरात डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. प्रकल्पाच्या प्रगतीचे नियमित परीक्षण आणि मूल्यमापन करण्यात येणार असून त्रैमासिक प्रगती अहवालाद्वारे तपासणी शिबिरांची संख्या, लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या, चष्मा वितरण आणि अन्य बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आवश्यक माहितीचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहिती संदर्भातील गोपनीयता आणि डेटा संरक्षणाच्या तरतुदींनाही करारामध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे.दरम्यान, यापूर्वी २०१९ पासून या उपक्रमाद्वारे १८ जिल्ह्यांतील ८०० शाळांमधील ६ लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६३ हजारांहून अधिक चष्मे पुरविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आजारांचे आणि तक्रारींचे वेळेत निदान व त्यावर उपचार होण्यास मदत होणार आहे. सोबतच गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध झाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

