कडा: कायद्याचे भय आणि प्रशासकीय यंत्रणेची कोणतीही पर्वा न करता एकाच रात्री तब्बल तीन बालविवाह उरकल्याची अत्यंत संतापजनक घटना आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आणि ग्राम बाल संरक्षण समितीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ग्रामसेवक, नातेवाईक आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिक मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबूनही संबंधितांविरुद्ध कसलीही अधिकृत फिर्याद देण्यात आली नाही. त्यामुळे बालविवाहाला थेट पाठीशी घालणाऱ्या ग्राम बाल संरक्षण समितीसह संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कडा पोलीस चौकीच्या हद्दीतील कानडी बुद्रुक येथील एका शेतवस्तीवर २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीतून एकाच वेळी तीन बालविवाह लावून देण्यात आले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजसेवकांनी पोलिसांची मदत मागितली. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन प्राथमिक चौकशी केली. यानंतर मंगळवारी दुपारपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत सरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित आणि नातेवाईक कडा पोलीस चौकीत ठाण मांडून बसले होते.कायद्यानुसार अशा संवेदनशील प्रकरणात ग्राम बाल संरक्षण समितीचे सचिव म्हणून ग्रामसेवकाने तात्काळ पुढे येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद देणे अनिवार्य होते. मात्र, रात्र उलटून गेली तरी कोणतीही लेखी तक्रार नोंदवण्यात आली नाही. यामुळे ग्रामसेवकावर कोणाचा राजकीय दबाव आला होता की जाणीवपूर्वक बालविवाहाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित कुटुंबांवर व मध्यस्थांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालहक्क कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी केली आहे.
पंच हजर नसल्याने विलंब; आज गुन्हा दाखल करणार : ग्रामसेवक
या संपूर्ण प्रकरणाबाबत कानडी बुद्रुकचे ग्रामसेवक एम. ए. माळेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "घटनास्थळी पंच वेळेवर हजर नसल्यामुळे मंगळवारी गुन्हा दाखल करता आला नाही. आज घटनास्थळाचा रीतसर पंचनामा पूर्ण करून या तीनही बालविवाह प्रकरणांत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल."

