Advertisement

रस्त्यावर उपसरपंचांचा मृतदेह अन् दुचाकीचा चुराडा!

प्रजापत्र | Wednesday, 26/08/2026
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२६ (प्रतिनिधी): तालुक्यातील श्रीक्षेत्र बाभळगाव येथील विद्यमान उपसरपंच वैजनाथ विठ्ठल लाटे यांचा मृतदेह बुधवारी (दि.२६) पहाटे भोपा ते बाभळगाव रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी त्यांची दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झालेल्या अवस्थेत सापडली असून, प्राथमिक माहितीनुसार हा भीषण रस्ता अपघात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, घातपात की अपघात, याचे नेमके सत्य शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येणार आहे.

     पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपसरपंच वैजनाथ लाटे हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून भोपा-बाभळगाव रस्त्याने जात होते. या प्रवासादरम्यान अज्ञात कारणाने हा भीषण अपघात घडला असावा. बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही स्थानिक तरुणांना रस्त्याच्या कडेला लाटे यांचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. जवळच त्यांची मोटारसायकल अपघातात चक्काचूर झालेली आढळून आली. तरुणांनी तात्काळ याची माहिती गावकरी आणि पोलिसांना दिली.घटनेची गंभीर दखल घेत दिंद्रुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी पांगवली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 

बाभळगाववर शोककळा; पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू 
वैजनाथ लाटे हे ग्रामपंचायत व सामाजिक कारभारात नेहमी आघाडीवर असणारे सक्रिय नेतृत्व होते. त्यांच्या अकाली आणि संशयास्पद मृत्यूची वार्ता पसरताच नातेवाईक, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. दिंद्रुड पोलीस घटनास्थळावरील वाहनाचे नुकसान, वाहनाच्या धडकेचे व्रण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत असून हा केवळ अपघात आहे की घातपात, या दिशेनेही पडताळणी केली जात आहे.

Advertisement

Advertisement