Advertisement

 अभ्यासोनी वर्तावे

प्रजापत्र | Monday, 08/02/2021
बातमी शेअर करा

'आपल्या क्षेत्रापेक्षा इतर विषयात बोलताना काळजी घेतली पाहिजे' असा सल्ला राष्ट्रवादीचे संस्थापक असलेल्या शरद पवारांनी भारतरत्न सचिन  तेंडुलकरला दिलाय. सचिन तेंडुलकरने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात विदेशातून काही प्रतिक्रिया आल्यानंतर जे ट्विट केले, त्या ट्विटची पार्श्वभूमी शरद पवारांच्या या सल्ल्याला आहे. शरद पवार हे सार्वजनिक जीवनात गेल्या ५-६ दशकांपासून आहेत, आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाची, समाजमनाची नस जितकी शरद पवारांना कळलेली आहे, तितकी नस कळलेला दुसरा नेता आज तरी महाराष्ट्रात नाही. त्यामुळेच शरद पवार काय बोलतात याला राजकीय, सामाजिक वर्तुळात नेहमीच एक वेगळे महत्व असते. सचिन हा क्रिकेटचा देव असेलही कदाचित, याबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना आहेत, पण याचा अर्थ सचिनचे समाजकारणात किंवा समाजमन निर्मितीत फार मोठे योगदान आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. म्हणूनच शरद पवारांनी सचिनला जो सल्ला दिला आहे, त्याचा अर्थ खूप मोठा आहे.

हे लिहीत असतानाच टिकरी सीमेवर आंदोलक शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याने चिट्ठीत पंतप्रधान मोदींचे नाव लिहिले. शेतकरी जिथे आत्महत्या करण्यापर्यंत पावले उचलतोय, त्यावरून हा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येऊ शकते, मग अशा विषयात कोणी उथळपणे व्यक्त होऊ पाहणार असेल तर शरद पवार यांच्यासारख्या सामाजिक उंचीच्या व्यक्तीनेच कान टोचणे आवश्यक होऊन जाते.
शरद पवारांचा सल्ला वरकरणी सचिन तेंडुलकरला आहे असे वाटत असले तरी तो व्यापक अर्थाने सर्वांनाच आहे. हे कोणी शहाण्यास शब्दांचा मार म्हणतात तसे घ्यावे किंवा कोणी 'लेकी बोले, सुने लागे' या अर्थाने समजून घ्यावे, हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा आणि वकुबाचा प्रश्न आहे. मागच्या काही काळात स्वतःला सेलीब्रेटी समजणारे, म्हणवणारे असतील किंवा माध्यमांमधील काही उथळ लोक असतील, आपला ज्यात अभ्यास नाही किंवा ज्याचा बुडशेंडा आपल्याला माहित नाही, अशा विषयावर भाष्य करायला उतावीळ झालेले सातत्याने पहायला मिळत आहेत. एखाद्या घटनेवर व्यक्त होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हे मान्यच. पण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासोबतच एक जबाबदारी असते, आपण व्यक्त होत असताना अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर व्यक्त होऊ नये ही ती जबाबदारी असते. याचे भान खरेतर सर्वानीच ठेवायचे असते आणि स्वतःला सेलीब्रेटी समजणाऱ्या आणि माध्यमकर्मी म्हणवणारांनी तर अधिकच करायचे असते. 

आपण माध्यमात आहोत किंवा सेलीब्रेटी आहोत म्हणून प्रत्येक विषयावर आपण बोललेच पाहिजे असे नाही, याची जाणिवच शरद पवारांनी या सल्ल्यातून करुन दिली आहे. पवारांनी नाव सचिनचे घेतले असले तरी हा सल्ला सर्वांनाच लागू पडतो. ज्यांना शेतकरी आंदोलन माहित नाही, राकेश टिकैतचा इतिहास भुगोल माहित नाही, एमएसपी कशाशी खातात आणि त्याचा शेतकऱ्याच्या भुकेवर काय परिणाम होतो याची जाणिव नाही असे लोक आज हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करित आहेत. ज्या रिहानाच्या प्रतिक्रियेवरुन सचिनपासून गाण कोकिळेपर्यंत सर्वांना कंठ फुटला, त्या कथित टूल किट प्रकरणात जिथे देशाचे परराष्ट्रमंत्री अजुनही आम्हाला पुरेशी माहिती नाही, माहिती मिळेल असे सांगत आहेत, तिथे याच देशातील काही बोलभांड जणूकाही निर्णय देऊन मोकळे झाले आहेत. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा पाया असतो, मात्र कोणत्याही माहितीशिवाय जो बोलभांडपणा केला जातो, तो या व्यवस्थेलाच सुरुंग लावीत असतो. मग या सुरुंगाला चुड देणारे हात कथित सेलीब्रेटींचे असतील, माध्यमकर्मींचे असतील, पक्षाच्या प्रवक्त्यांचे असतील  किंवा आंतरजालीय (इंटरनेट) विद्यापिठाच्या माहितीआधारे सोशल मिडीयात तज्ञ म्हणून मिळविणाऱ्यांचे असतील, असे हात वेळीच रोखणे गरजेचे असते.

कोणताच व्यक्ती सर्व क्षेत्रात पारंगत नसतो आणि  काही अपवाद वगळता सर्वांनाच सर्वच क्षेत्रातील सारे काही कळतही नसते. याचा अर्थ नियमित घडामोडींवर कोणी बोलायचेच नाही असा मुळीच नाही, पण कोणत्याही विषयावर बोलताना 'अभ्यासोनी वर्तावे' हे सूत्र सर्वांनाच लागू होते हाच शरद पवारांच्या सल्ल्याचा व्यापक अर्थ आहे. तो कोणी समजून घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण सुज्ञांस सांगणे न लगे.
 

Advertisement

Advertisement