बीड दि .१८(प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या धाराशिव -बीड- छ. संभाजीनगर प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळायला सुरुवात झाली आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या हवाई आणि जमिनी पाहणीचे आदेश मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आले असून त्याचे कंत्राट देखील देण्यात आले आहे. शुक्रवारपासून या पाहणीला सुरुवात झाली असून आणखी दोन दिवस ही पाहणी चालणार आहे.
बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर-बीड -परळी या रेल्वेमार्गाचे काम आता गती घेत आहे. येत्या वर्षभरात हा र्फळेवे मार्ग पूर्ण करण्याचे घाटत असतानाच आता जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या आणखी एका रेल्वेमार्गाला गती मिळणार असल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात धाराशिव -बीड- छ. संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती. तसेच हा प्रस्तावित रेल्वे मार्ग महत्वाचा असल्याने या मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून संपूर्ण पाठपुरावा सुरु आहे.
या रेल्वे मार्गाच्या प्राथमिक सर्व्हेक्षणाचे कार्यात आदेश मध्य रेल्वेने आरवी इंजिअरिंग कन्सल्टन्सी हैद्राबाद यांना दिले असून आता संबंधितांनी या रेल्वेमार्गाची हवाई आणि जमिनी पाहणी सुरु केली आहे. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात कंपनीच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाची हवाई आणि जमिनी पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत असून कंपनीने तसे जिल्हाप्रशासनाला कळविले आहे. शुक्रवारी यासाठी 'आरवी'च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे हेलिकॉप्टर बीडच्या अवकाशातून उडाले होते , आता आणखी दोन दिवस ही पाहणी होणार असून त्यानंतर सदरचा अहवाल मध्यरेल्वेकडे सोपविला जाणार आहे.

प्रजापत्र | Saturday, 19/07/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा