गेवराई दि. १८ (प्रतिनिधी) शहरातील कायदा–सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गेवराई पंचायत समिती जवळील चौकातून एका तरुणीला जबरदस्तीने उचलून कारमध्ये टाकत अपहरण केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेला हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित वाहनाचा शोध सुरु केला आहे.
संबंधित तरुणी कॉलेजमधून पंचायत समिती जवळील रस्त्याने शास्त्री चौकाच्या दिशेने पायी जात होती. याच वेळी अल्टो कारमधून आलेल्या दोन तरुणांनी अचानक तिच्या दिशेने धाव घेतली. तरुणीने जोरदार प्रतिकार करत आरडा ओरड केला. मात्र आरोपींनी तिला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि घटनास्थळावरून भरधाव वेगात पळ काढला.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला मात्र आरोपींनी गाडी न थांबवता शास्त्री चौकातून पुढे शहागडकडे धाव घेतली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला आहे.घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने दखल घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून,अपहरणासाठी वापरलेल्या अल्टो कारचा विविध दिशांनी शोध घेतला जात आहे. शहरात व आसपासच्या परिसरात नाकाबंदी करून पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे.भरदिवसा तरुणीचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

