शिरूर दि.१४(प्रतिनिधी): तालुक्यातील फुलसांगवी शिवारामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मेंढपाळांच्या घोड्याची मेंढीची बिबट्याने शिकार केली आहे.या हल्ल्यामुळे फुलसांगवी परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी शिवारामध्ये सुभाष भुजंगराव ढाकणे या फुलसांगवी मार्कडवाडी रस्त्या लगतच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बिगवण येथील मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप बसवलेला होता. याच ठिकाणी त्यांनी आपली जागलही ठेवली होती. रात्री एक ते दीडच्या दरम्यान या मेंढपाळाच्या जागली वरती बिबट्याने हल्ला चढवून येथील या मेंढपाळाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या घोड्याची,एका मेंढीची शिकार केली आहे. घोड्याच्या नरड्याचा चावा घेऊन त्याला गतप्राणी केले व त्याचे पोटाजवळील मांस भक्षण करून त्या ठिकाणाहून बिबट्या पसार झाला असल्याचे सांगितले आहे.सदरील घटनेची माहिती पाटोदा वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेमध्ये सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये हजार रुपये किमतीचा घोडा व पंधरा ते वीस हजार रुपये किमतीची मेंढी असा सुमारे एक लाख रुपये किमतीची पशुधन बिबट्याच्या भक्षस्थानी ठरले आहेत. या बिबट्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्याला वन विभागाने भयमुक्त करावे अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे.

