नागपूर : नागपुरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधान भवनाबाहेर मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळतोय. विविध संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. यापैकीच शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं आंदोलनाने आता आक्रमक रुप धारण केलं आहे. गेल्या १० महिन्यांपासून ६३२ शिक्षकांचे पगार थकवण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे शिक्षक समितीकडून विधान भवनाच्या बाहेर अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षकाची प्रकृती बिघडली आहे. या महिलेला पोलिसांनी रुग्णालयाच्या दिशेला नेलं आहे. दुसरीकडे आंदोलक आपल्या मागण्यांसाठी प्रचंड आक्रमक झालेले आहेत.
शालार्थ शिक्षक संघर्ष समितीने नागपुरात अन्नत्याग आंदोलन केलं. पण आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही म्हणून शिक्षण संघर्ष समितीने नागपूरच्या विधान भवनाबाहेर आपला मोर्चा नेला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी प्रचंड आक्रोश केला. एका महिलेची तर अक्षरश: प्रकृती बिघडली.शालार्थ शिक्षण समितीचं गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनस्थळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भेट दिली होती. नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये शिक्षण संघर्ष समितीचं पाच दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांचं सरकार काय करणार? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

