Advertisement

 ईट शिवारात पवनचक्की वाद पेटला

प्रजापत्र | Thursday, 11/12/2025
बातमी शेअर करा

भूम दि.११(प्रतिनिधी): ईट शिवारातील पवनचक्की प्रकल्पाच्या कामावरून स्थानिक शेतकरी आणि प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीमध्ये निर्माण झालेला वाद चांगलाच तीव्र झाला आहे. आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मागितल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा दावा करत वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना कशी घडली?
३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता मौजे ईट येथील गट क्रमांक 247/अ व 248/ड परिसरात ही घटना घडली. टोरेन्ट सोलर पॉवर प्रा. लि. अंतर्गत आय एनर्जी इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीकडून पवनचक्कीचे खड्डे खोदणे व रस्ता बांधकामाचे काम सुरू होते.यावेळी डोकेवाडी येथील शेतकरी गोकुळेश डोके, शोभाबाई डोके, बब्रुवान डोके, औदुंबर डोके आणि रंजीत डोके यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवले.

शेतकऱ्यांचा आरोप — “करारापेक्षा जास्त जमीन वापर; मोबदला द्या”शेतकऱ्यांच्या मते,कंपनीकडून करारनाम्यापेक्षा जास्त जमीन वापरली जात आहे,पवनचक्की प्रकल्पामुळे जमीन कायमस्वरूपी वापराबाहेर जाते,त्यामुळे मोबदला, नुकसानभरपाई आणि चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“आमच्या शेतातून वाहने नेऊ नका; नेणार असाल तर मोबदला द्या,” अशी मागणी आम्ही केली, असे गोकुळ औदुंबर डोके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.
“कंपनीने उलट आमच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे,” अशी त्यांची भावना आहे.

कंपनीचा आरोप — “१५ लाखांची खंडणी मागितली”

फिर्यादी अजयकुमार शर्मा (वय ५६) — कंपनी अधिकारी — यांच्या तक्रारीनुसार,शेतकऱ्यांनी काम थांबवून “१५ लाख रुपये द्या तेव्हाच परवानगी” अशी मागणी केली.कंपनीची वाहने रस्त्यात उभी करून अडवण्यात आली आणि संध्याकाळी ७ वाजता आरोपी रंजीत डोके यांनी फोनवरून पुन्हा १५ लाखांची मागणी केल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल
वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 423/2025 नुसार खालील कलमांखाली गुन्हा नोंद बीएनएस 308 (4)126(2)352351(2)(4)3(5)गुन्हा ९ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ७:०८ वा. पोह. 1516 यादव यांनी नोंदवला असून पुढील तपास पोह. 1043 मारकड यांच्याकडे आहे. प्रभारी अधिकारी पोनि शिंदे यांनी तपासाचे आदेश दिले.

 

परिसरात चर्चांना उधाण
या प्रकरणामुळे ईट शिवारात मोठी चर्चा रंगली आहे.
जमिनीचा मोबदला, प्रकल्पामुळे होणारा जमीन वापर, शेतकऱ्यांचे हक्क आणि कंपनीची भूमिका या प्रश्नांवर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement