पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात नेत्यांचे पैशांच्या बंडलांसोबतचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये विघ्य्रल होताना दिसत आहेत. आता तर एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भ्रष्टाचार हा आता काही अस्पृश्य म्हणावा असा शब्द राहिलेला नाही हे मान्य केले तरी पैशांचे व्यवहार अगदीच बिनदिक्कतपणे कॅमेरॅसमोर देखील करण्याइतका कोडगेपणा येथील व्यवस्थेत, मग ते लोकप्रतिनिधी असोत किंवा सरकारी बाऊ , भिनलेला असल्याने आता सामर्थ्य आहे पैशाचे , जो जो जमविला तयाचे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
फार पूर्वी , म्हणजे ९० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आला, त्यावेळी त्या ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. अगदी त्याच काळाच्या आसपास हवाला घोटाळा गाजला होता . एका हवाला दलाच्या डायरीत काही नेत्यांची नावे आढळली होती, त्यावेळीं विरोधीपक्षात असलेल्या लालकृष्ण अडवाणींनी त्यावेळी नैतिकतेच्या कारणातून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याही प्रकरणाने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. कॅमेऱ्यासमोर पैसे घेताना पकडले गेल्याने बंगारू लक्ष्मण या भाजप अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणांची आठवण आज यासाठी करायची, की राजकारणातून अर्थकारण हे विषय अगदी ३ दशकापूर्वी देशात गांभीर्याने घेतले जायचे आणि त्याला राजमान्यता किंवा लोकमान्यता नव्हती. आताची परिस्थिती काय आहे, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जी सत्तांतरे झाली, किंवा घडवून आणली गेली , ती कशाच्या जोरावर होती, किंवा त्या साऱ्या घटनाक्रमाला सत्तेसोबतच आणखी कशाचे बळ होते हे कोणालाही वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात '५० खोके , एकदम ओक्के ' हे वाक्य अगदी लहान लेकरांच्या तोंडी देखील यावे इतकी तात्विक अधोगती म्हणा किंवा 'राजकारणातून आर्थिक क्रांती' म्हणा केव्हाच गाठली गेली आहे. मागच्या काही काळात राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांचे पैशांच्या बंडलसोबत असलेले अनेक व्हिडीओ समोर आलेले आहेत. यात कोणाचे एकाचे नाव घेण्याची आवश्यकता यासाठी वाटत नाही, की राजकारणात सुरु असलेल्या या लक्ष्मीदर्शन किंवा प्रदर्शनाचे कोणालाच काहीच वावगे वाटत नाही. प्रत्येक व्हिडीओ आल्यानंतर 'तो मी नव्हेच ' असा कोडगेपणा दाखवला जातो, आणि त्यानंतर पुढे काहीच होत नाही. अगदी मंत्र्यांच्या बेडरूममधले , नेत्यांच्या घरातले पैशांचे व्हिडीओ बाहेर येतात, शासकीय विश्रामगृहाच्या कक्षात विधिमंडळ समितीच्या सदस्यांकडे मोठी रोकड सापडते , मात्र यापैकी कशाचेच वावडे ना सरकारला वाटते , ना विरोधीपक्ष रस्त्यावर यावर आवाज उठवतो. फार तर सभागृहात घोषणाबाजी होते, पण यातून फार काही साध्य होण्याचे दिवस आता केव्हाच संपले आहेत.
लोकप्रतिनिधींचेच असे व्हिडीओ आहेत असे नाही, आता तर पोलीस अधिकाऱ्याचा देखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहेच. यापूर्वी एसीबीच्या कारवाईत अधिकाऱ्यांच्या घरी मोठे घबाड सापडायचे, मध्यंतरी एका न्यायाधीशाच्या घरी आग लागल्यानंतर असेच घबाड सापडले होतेच, त्याची सवय आता देशाने लावून घेतलीच आहे, मात्र अधिकारी काय किंवा लोकप्रतिनिधी काय, आता पैशांचे व्यवहार इतके बिनदिक्कत करत आहेत की त्यांना आपल्यासमोर कॅमेरा आहे याची देखील भिती उरू नये हा कोडगेपणा साहजिकच सत्तेच्या अहंकारातून आलेला आहे.पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच एकमेव सूत्र सध्या उरले आहे का काय असे वाटावे अशीच परिस्थिती सर्वत्र आहे आणि त्याला रोखणे तर दूर , त्याला चूक म्हणण्याची मानसिकता देखील कोणतीच व्यवस्था दाखवीत नाही त्याचे काय ?

प्रजापत्र | Thursday, 11/12/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
