बीड दि. १० (प्रतिनिधी ) : मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन शासन निर्णय जरी करण्यात आला. मात्र त्या नुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे फारसे अर्जच येत नसल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात प्रमाणपत्र मागणीचे अर्ज येण्याचे प्रमाण कमी असल्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष असलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगत आता कुणबी प्रमाणपत्र मागणीचे अर्ज वाढावेत यासाठी गावागावात दवंडी द्यावी तसेच याची अधिकाधिक प्रसिद्धी करावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी मामुंबईत आंदोलन केले होते. त्यावेळी राज्यशासनाने २ सप्टेंबर रोजी शासन आदेश काढून ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत, मात्र ज्यांच्या कुळातील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा मराठा समजतील व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली होती. त्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्याच्या आणि त्यांच्या अहवालानुसार अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा असे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्वत्र अशा गाव पातळीवरील समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र या शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र मागणीचे अर्जच फारसे येत नसल्याचे चित्र मराठवाडा विभागात आहे.
मराठा आरक्षणसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (दि. ९ ) कुणबी प्रमाणपत्र विचारांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अत्यल्प अर्ज येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मागणीचे जास्तीत जास्त अर्ज यावेत यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी गावागावात दवंडी द्या, या मोहिमेची प्रसिद्धी करा, गावपातळीवरील समित्यांच्या बैठका घ्या, अर्ज कमी का येत आहेत याचा अभ्यास करून उपाययोजना करा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनालाच लोकांना अर्ज करण्यासाठी उद्यक्त करावे लागणार आहे.
परभणी, जालन्यात प्रलंबित अर्जाची संख्या जास्त
नवीन शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या बाबतीत परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३९२ तर जालना जिल्ह्यात ७० अर्ज प्रलंबित आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ अर्ज प्रलंबित असून त्यातील एकही निकाली निघालेला नाही
बीड जिल्ह्यात २२ प्रमाणपत्रांचे वाटप
सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतर बीड जिल्ह्यात नवीन निर्णयाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आतापर्यंत २२ अर्ज आले असून त्या सर्वांना प्रमाणपत्राचे वितरण झाले आहे.
जात प्रमाणपत्रासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची पहिलीच वेळ
साधारणतः जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांनाच प्रशासकीय कार्यालयांचे खेटे घालावे लागतात, तरीही वेळेत प्रमाणपत्रे मिळत नाहीत. त्यासाठी अनेकांचा भरपूर वेळ देखील जातो, मात्र प्रशासकीय पातळीवर त्याची फारशी दाखल घेतली जात नव्हती. नाही म्हणायला जात पडताळणी कार्यालयांमार्फत शाळा महाविद्यालयांमध्ये कॅम्प आयोजित केले जायचे, मात्र ते देखील अपवादानेच. आता मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे अर्ज यावेत यासाठी प्रशासनाने गावागावात दवंडी देण्याचा प्रयोग करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असावी

