Advertisement

 बीड दि.८ (प्रतिनिधी)-:राज्याचे कर्तव्यकठोर म्हणविणारे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचा कामाचा धडाका मोठा असला तरी त्यांनी बीड जिल्ह्यात प्रशासन दाखविलं तेच आणि तितकेच पाहायचे ठरविले असावं.यामुळे अजित पवारांना वास्तव माहितच होत नाही किंवा त्यांना पाहायचे नाही असे वाटावे अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.मुळातच अजित पवारांना समोर करून प्रशासनाने केवळ विक्रम नोंदवायचा म्हणून 'हरित बीड' अभियानातून 'विवेक' धाब्यावर बसवत झाडे लावण्याचा 'खेळ' केला. त्यातील बोगसगिरी आता उघड होत आहे.स्वतः अजित पवारांनी लावलेल्या झाडाची देखील निगा प्रशासनाला राखता आलेली नसून आजघडीला त्या झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.त्यामुळे उठसूट बीडला नाव ठेवणाऱ्या अजित पवारांनी एकदा प्रशासनाच्या चष्म्याच्या पलीकडचे वास्तव पाहावे असे बीडकरांना वाटत आहे.
        राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांकडे बीडचे पालकत्व आल्यानंतर बीडमध्ये फार मोठे बदल होतील अशी भाबडी अपेक्षा सामान्य बीडकरांना होती.मात्र बीडमध्ये स्थानिकांना नावे ठेवायची आणि केवळ प्रशासन दाखवेल तेच आणि तितकेच पाहायचे ही कार्यपद्धती अजित पवारांनी स्वीकारली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील मग अजित पवार आले की त्यांच्या मागेपुढे करायचे आणि त्यांना सोयीचे तितके दाखवून चमकोगिरी करायची पद्धत स्वीकारली.
बीड जिल्ह्यात हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत एकाच दिवशी तीस लाख झाडे लावण्याचा विक्रम नोंदवून घेतला. यासाठीच्या कार्यक्रमाला स्वतः अजित पवार उपस्थित होते. अजित पवारांच्या हस्ते शहरातील खंडेश्वरी,दीपमाळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ७ ऑगस्टला हा कर्यक्रम झाला, त्याला आता ४ महिने झाले आहेत. मात्र अजित पवारांची पाठ वळताच स्वतः अजित पवारांनी लावलेल्या झाडांची प्रशासनाकडून उपेक्षा झाली आणि आता त्या झाडांच्या केवळ काड्या त्या मैदानावर उभ्या आहेत.त्याच्या शेजारी खुरटे गावात काय ते वाढले आहे. आता रेशीम उत्पादनासाठी सातत्याने ज्याची कंपनी करावी लागते, त्या तुतीला देखील हरित वृक्ष लागवडीत वृक्ष ठरवून नरेगाच्या योजनेतील अनुदानासाठी केलेल्या त्या लागवडीला देखील केवळ 'आकडा 'वाढविण्यासाठी वापरण्याचा 'विवेक ' ज्या प्रशासनाने दाखविला, ते उद्या झाडे सुकली म्हणून काय झाले, खुरटे गवत तर 'हरित ' आहे ना असेही अजित पवारांना दाखवू शकते.
मुळातच प्रशासनाची केवळ विक्रम नोंदविण्यासाठीची,धाराशिव जिल्ह्याने एका दिवसात १५ लाख झाडे लावली, मग आम्ही ३० लाख लावू या चढाओढीतून काढलेली मोहीम निव्वळ हीरोगिरीची असून कागदावर दाखविलेली आणि प्रत्यक्षात असलेली झाडे यात मोठी तफावत असल्याचे 'प्रजापत्र ' सह सर्वच माध्यमांनी वेळोवेळी दाखविले आहे.आता अजित पवारांनी लावलेल्या झाडांच्या केवळ काड्या उभ्या आहेत, हे तरी अजित पवार पाहणार का ? आणि त्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात सुरु असलेल्या 'विवेकी' कारभारावर काही भाष्य करणार का हा प्रश्न सामान्य बीडकरांना पडला आहे.

Advertisement

Advertisement