सुरुवात कोठून झाली, कोणी क्रिया केली,कोणी प्रतिक्रिया दिली या साऱ्या बाबी पोलीस तपासाच्या असल्या तरी नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी बीड जिल्ह्यातील गेवराईत जे काही घडले,ते केवळ आणि केवळ निंदनीय म्हणावे असेच होते.मतदानाच्या दिवशी कोणाच्याही घरात किंवा घरावर जाऊन गोंधळ घालणे,दगडफेक,मारहाण करणे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही.आणि त्यातही राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजित पवारांसारख्या नेत्याकडे जिल्ह्याचे पालकत्व असताना असे काही घडते आणि घटनेच्या तीन दिवसांनंतरही अजित पवार यावर काहीच भाष्य करत नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा? इतरवेळी कोणत्याही कारणातून बीडकरांना अक्कल शिकविणारे अजित पवार आता गप्प का आहेत?
राजकीय पातळीवर नेहमीच चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जे काही घडले ते सर्वांनाच आत्मचिंतन करायला भाग पाडणारे आहे.मागच्या काळात जिल्ह्यात केवळ परळीवर टीका झाली,आता गेवराईत तर परळीच्या पुढचे म्हणता येईल असे घडले आहे.मतदान केंद्रावरील वाद थेट नेत्यांच्या घरापर्यंत जातात आणि दोन्ही बाजूंनी क्रिया,प्रतिक्रिया म्हणत राडा होतो हे निश्चितच जिल्ह्याच्या प्रतिमेला तडे देणारे आहे.यात दोष कोणाचा? कोणी अगोदर कळ काढली? कोणी कोणाला मारहाण केली, कोण कोणाच्या अंगावर धावून गेले हे सारे यथावकाश तपासात येईलच,किंबहुना गेवराईकरांना ते माहित देखील आहे.ज्याचा थेट राजकारणाशी संबंध नाही अशा स्वीय सहाय्यकास मारहाण करणे असेल किंवा समाज ज्यांच्याकडे जबाबदार म्हणून पाहतो त्यांनीच कार्यर्कत्यांना आवरण्याऐवजी आपणच गोंधळ घालणे असेल हे लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित नव्हते.
मात्र या साऱ्यापेक्षाही अनपेक्षित आहे, ते या विषयावरील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मौन.अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे.ते पालकमंत्री म्हणून नेहमी बीडकरांना 'बीड किती वाईट आहे आणि आता ते आल्यापासून कसे ते बीडला बदलत आहेत' असे सांगत असतात. बीडकरांना जाहीरपणे हिणविण्याची एकही संधी कधी अजित पवार सोडत नाहीत.अगदी त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांना चारचौघात हिणवताना देखील त्यांना काही वावगे वाटत नाही.आता यात काहींना त्यांचा स्पष्टवक्तेपणा वाटत असेल तर वाटो,पण अजित पवार बीडकरांना नेहमी काही ना काही सुनावत असतात हे नक्की.पण तेच अजित पवार जिल्ह्यात इतकी मोठी घटना घडूनही अद्याप काहीच बोलले नाहीत.कृती होईल अथवा न होईल पण किमान' हे असले खपवून घेणार नाही' असले काही तरी त्यांनी किमान बोलावे असे अपेक्षित होते,पण त्यांच्याकडून तसे काहीच अद्याप तरी समोर आले नाही. त्यांच्या कार्यालयाकडून याबाबत कसले ट्विट देखील आलेले नाही.कदाचित महायुतीचा धर्म त्यांना या विषयावर काही भाष्य करायला अडवत आहे का? असे आता वाटू लागले आहे. गेवराईत जे काही घडले ते महायुतीच्या दोन पक्षांच्या नेत्यांमध्येच. त्यामुळे आता काही बोलावे तरी अडचण, दोष नेमका कोणाला द्यायचा आणि काय करायला सांगायचे असे तर अजित पवारांना वाटत नसेल ना?
मुळात अजित पवार कितीही बढाया मारोत,त्यांनी बीडचे पालकत्व घेतल्यानंतर फार काही अमुलाग्र म्हणावे असे त्यांना करता आलेले नाही,पण किमान कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तरी त्यांनी काही बदल घडविणे अपेक्षित होते.मग येथे ते देखील दिसत नाही.साधारणपणे ज्यावेळी स्थानिकांच्या निवडणुका असतात, त्यावेळी त्या भागात रुळलेले,प्रत्येक ठिकाणाची माहिती असलेले आणि तेथील लोकांना ओळखणारे अधिकारी त्या ठिकाणी असतील तर त्यांना बदलले जात नाही,कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ते सोयीचे असते,त्यांना काही घटनांची माहिती आगाऊ मिळू शकते,मात्र बीड जिल्ह्यात असे काही तत्व पाळाले गेले नाही. गेवराईत इतका मोठा राडा घडू शकतो, याची पूर्वकल्पना पोलीस प्रशासनाला येऊ नये हे देखील व्यवस्थेचे अपयशच, अजित पवार याबाबत तरी काही जाब विचारण्याची औपचारिकता पूर्ण करणार आहेत का? या प्रकरणात नेमके कोण कोण चुकले त्या सर्वांनाच ज्याच्या त्याच्या चुकीसाठी जबाबदार धरले जाणार आहे का? आणि त्यासाठी पालकत्वाच्या भूमिकेतून अजित पवार नेमके केव्हा बोलणार आहेत?

बातमी शेअर करा
