आंदोलनांची आणि चळवळींची शक्ती क्षीण झाली आहे, आंदोलनांनी असे काय बदल घडणार ? आता कुठे रस्त्यावरची आंदोलने होतात हे आणि असले बरेच काही बोलणारांची झाक उतरावी असे आंदोलन , ज्या बीड जिल्ह्याला मागच्या काही काळात सातत्याने बदनाम केले गेले, त्याच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी करून दाखविले आणि निव्वळ केले नाही, तर मोठमोठ्या कारखानदारांना , सुरुवातीपासून अगदी आडमुठी भूमिका घेणारांना देखील वठणीवर आणता येते , आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात हे दाखवून दिले आहे. बीड जिल्ह्यात सुरु झालेलय आणि लगतच्या जिल्ह्यांमध्येही पसरू लागलेल्या ऊस दाराच्या आंदोलनाला आता अपेक्षित यश मिळत आहे. 'होय , आंदोलनं जिंकतात ' हा विश्वास या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्याला चळवळी आणि आंदोलनांचा मोठा वारसा आणि इतिहास आहे. मागच्या काही काळात कोणत्यातरी अपवादात्मक घटनेवरून बीड जिल्ह्याला राज्यात बदनाम करण्यात आले असले तरी बीड जिल्हा हा कायम आपल्या हक्कांसाठी , अधिकारांसाठी सजग असलेला जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी मागच्या काळात उदरासाठीचे आंदोलन उभारले. एकीकडे जिल्ह्यात आणि राज्यात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना , या आंदोलनाकडे माध्यमांचे देखील म्हणावे तितके लक्ष नव्हते, तेथे राज्यकर्त्यांना हे आंदोलन फार लक्षात यावे अशी परिस्थिती नव्हती. मात्र आपल्या मागण्या योग्य आहेत याची खात्री असेल आणि त्याला योग्य त्या पद्धतीने मांडण्याची, त्या मागण्यांमधील तात्विकता आणि व्यवहार्यता समोर कोणीही असेल तर त्याला पटवून देण्याची धमक असेल तर आंदोलन यशस्वी करता येते हे या शेतकऱ्यांच्या पोरांनी दाखवून दिले. किसान सभेच्या पुढाकारातून सुरु झालेल्या या आंदोलनाला जिल्ह्यात अनेक समविचारी म्हणा किंवा शेतकरी हितासाठी झटले पाहिजे असे वाटणाऱ्या म्हणा अनेकांनी सहकार्य केले, आणि आंदोलनाचा प्रवाह मोठा झाला. उमेश देशमुख, .अजय बुरांडे ,दत्ता डाके , जगदीश फरताडे हे तसे एकाच विचारातले, नारायण गोले फार तर समविचारी , पण अजयसिंह राऊत, नामदेव सोजे , अजय कारंडे असे अनेक ठिकाणाहून अनेक प्रवाह या आंदोलनात सहभागी झाले आणि आंदोलनाची व्यापकता वाढली. येथे पक्षीय विचार कोणीच आणला नाही आणि त्यातूनच शेतकऱ्यांसाठीचे एक दाहक आंदोलन उभे राहिले. आणि याची दाखल सर्वांनाच घ्यावी लागली. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्याच नुकसान होईल असली आडमुठी भूमिका काही ठिकाणी घेतली गेली, मात्र त्यांच्याही डोक्यात आपल्या मागण्या कशा व्यवहार्य आहेत याचा 'प्रकाश ' पाडण्याचे बुद्धीचातुर्य आंदोलकांनी दाखविले. सनदशीर मार्गाने , आंदोलनांच्या मार्गाने, चर्चेच्या पातळीवर कोठेही जाण्याची तयारी दाखवितानाच आंदोलन दडपण्याच्या दडपशाहीला न जुमानता ठामपणे परिस्थितीला सामोरे जाण्याची जी तडफ या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ती तडफ रस्त्यावरच्या आंदोलनांमधून खूप दिवसानंतर दिसली. राजकीय पक्षांचे असतील किंवा कोणत्या तरी अस्मितांसाठीचे रास्तारोको, म्हणजे केवळ काही काळासाठी किंवा ज्याला प्रतीकात्मक म्हणता येतील असेच होत असताना , कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवत रस्त्यावर उतरलो आहोत हा संदेश आंदोलक समाजाला आणि व्यवस्थेला देऊ शकले आणि त्यामुळेच हे आंदोलन हल्ल्यात घेता येणार नाही हे व्यवस्थेतल्या लोकांनाही समजले. आणि त्यातूनच सुरुवातीला या आंदोलनाची तरी उडवू पाहणारे लोकप्रतिनिधी देखील नंतर निमूटपणे मागण्यांवर विचार करायला तयार झाले हे यश सोपे नाही. ज्या बीड जिल्ह्यात काही दशकांपूर्वी आपला ऊस कारखाना नेट नाही म्हणून शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून त्यात स्वतःला जाळून घेतले होते, त्या बीड जिल्ह्यात कारखानदारांना आपल्या मागण्यांवर चर्चेला आणता येते आणि आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात, ही सारी शक्ती आंदोलनात आहे हे या शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. देशभरातच एकूणच चळवळी, आंदोलने याबद्दल एक नकारात्मक भाव पसरवला जात असतानाच्या काळात बीड जिल्ह्यातले शेतकरी आंदोलन सर्वांसाठीच आशेचा किरण ठरावा

बातमी शेअर करा
