बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : 'सैया भये कोतवाल तो डर काहे का' या हिंदी म्हणीची आठवण यावी अशी 'मॅजिक मोमेन्ट' सध्या बीडमध्ये सर्रास सुरु आहे.नाव स्पाचे,भाषा होम सर्व्हिसची आणि त्यातून वारेमाप पैसे कमावण्याची 'मॅजिक' असा सारा प्रकार सध्या बीडमध्ये खुलेआम सुरु आहे.फोनवर थेट महिलांचे अर्धनग्न फोटो आणि 'मसाज'चे रेट पाठवून ग्राहक आकर्षित करायचे सगळे काळे धंदे अगदीच 'गोरे'पणाने करण्याचा उद्योग सध्या जोरात आहे. आपण कसेही नाचलो तरी पोलीस आपल्याला काहीच करणारच नाहीत या विश्वासातूनच हे सारे होत असल्याने आता तरी पोलिसांचे डोळे उघडणार का ? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

स्पा चे नाव वापरून होम सर्व्हिस आणि हॉटेल सर्व्हिसची सेवा देण्याची 'मॅजिक' सध्या बीडमध्ये काळे'गोरे'धंदे करणाऱ्यांनी सुरु केली आहे.त्यांच्या अनोख्या या 'मोमेन्ट'मुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होऊ लागली.एक तासापासून ते रात्रीपर्यंत यासाठी वेगवेगळे दर देखील आकारण्यात येत आहेत.विशेष म्हणजे सेवेसाठी वेगवेगळ्या मुलींचे आकर्षक फोटो टाकून निवड करण्याची मुभा देखील दिली जाते.अर्धवट कपडे आणि मेकअप केलेल्या फोटोतून मुलींची निवड केल्यानंतर एका तासासाठी ५ हजार ,दोन तासांसाठी १० हजार आणि पूर्ण रात्रीचे १५ हजार असे दर आकारण्यात येतात.आणि हो,ग्राहक सांगेल तेथे यातील निवडलेल्या मुलीला 'सर्व्हिस' देण्यासाठी पाठवले जाते.आता त्यानंतर त्या सर्व्हिसच्या 'मोमेन्ट' कोणत्या असतात ते सर्विह्स पुरविणारेच जाणोत. विशेष म्हणजे हे सर्व पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि तेही पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्यासारख्या कठोर पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात होत असताना याच्या पाठीशी नेमका कोणत्या 'लक्ष्मीचे दर्शन'दडले आहे याचे मात्र उत्तर मिळालाय तयार नाही. आज आयजी वीरेंद्र मिश्रा स्वतः बीडमध्ये येत आहेत अशी माहिती आहे.कदाचित ते स्वतः तरी या स्पाच्या नावाखाली भरणाऱ्या या अश्लील बाजाराकडे लक्ष्य देतील अशी अपेक्षा आहे.

