मुरगूड : आज संपूर्ण राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरू असतानाच, या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश मुरगूड पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाद्वारे केला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून, मुरगूड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आज राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी बसले आहेत. अनेक केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही समावेश आहे.या सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमधील सर्वजण कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत होते. रविवारी मध्यरात्री पोलीस पथकाने या टीईटी पेपर फोडणाऱ्या टोळीला जेरबंद केले. अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

