संजय मालाणी
बीड दि. २२ : बीड जिल्ह्यातील स्वपक्षाचे आमदार धनंजय मुंडे आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही टीका करत राजकीय वाटचाल करणारे माजलगावचे राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके एकीकडे आपला 'मुंडे ' विरोधी अजेंडा राबवित असतानाच दुसरीकडे ' बीड जिल्ह्यात फक्त परळीमध्ये युती झाली, इतर ठिकाणी होऊ शकली नाही , व्हावी यासाठी कोणी प्रयत्न देखील केले नाहीत ' अशी भूमिका मांडताना दिसत आहेत. यात 'कोणी प्रयत्नही केले नाहीत ' या वाक्यातून आ. सोळंकेंना नेमके कोणाकडे बोट दाखवायचे आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे एकाच वेळी 'मुंडे ' विरोधी राजकीय अजेंडा राबवायचा आणि सोबतच 'मुंडें'च्या सहकार्याची अपेक्षाही ठेवायची हे नेमके कोणते राजकारण असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे.
माजलगाव मतदारसंघाच्या राजकारणात आ. प्रकाश सोळंके यांचा प्रभाव आणि शक्ती कोणी नाकारू शकत नाही. ज्या मतदारसंघाची एक आमदार दुसऱ्यांदा निवडणून न देण्याची परंपरा होती, त्या मतदारसंघातून एकदा नव्हे तर आता त्यांची निवडून येण्याची ही पाचवी वेळ. ग्रामीण भागातून जिल्हापरिषदेत स्वतःचे म्हणता येतील असे ७-८ सदस्य नेहमी ते निवडून आणू शकतात हा त्यांचा प्रभाव. मात्र या साऱ्या शक्तीची नोंद त्यांच्या नावे असली तरी त्यांच्या या शक्तीला नेहमी जोड घ्यावी लागायची ती मुंडेंचीच . अगदी प्रकाश सोळंके पहिल्यांदा आमदार झाले ते देखील दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्याच सहकार्याने, भाजपात आल्यावरच. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आ. सोळंके सुमारे १ दशक भाजपात राहिले, मात्र नंतर त्यांचे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील बिनसले. त्यांच्यातील मतभेद टोकाला गेले होते, हे साऱ्या जिल्ह्याने नव्हे तर राज्याने अनुभवलेले होते. राजकारणात 'शेळीचे शेपूट ' हा शब्दच आला तो मुळी मुंडे-सोळंके वादातून .नंतरच्या काळात आ. सोळंके राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होत गेले. मात्र या पक्षात त्यांच्या राजकीय विस्ताराला मर्यादा येत गेल्या. आपल्याकडे खूप काही असतानाही आपल्याला संधी नाकारली जाते आणि त्याचवेळी मागून आलेले धनंजय मुंडे मात्र पक्षात मोठे होतात , याचे शल्य आ. प्रकाश सोळंके यांना कायम बोचत आलेले आहे. (अगदी २०१९ मध्ये विधानसभेत विजय मिळालेल्या आ. सोळंकेंना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही आणि धनंजय मुंडे मात्र मंत्री झाले, त्यावेळी त्यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा देखील केली होती. प्रत्यक्षात त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्रे पाठविली नाहीत हा भाग वेगळा. तर 'मुंडे ' सोळंके संबंध असे राहिलेले आहेत. ) मात्र असे असले तरी त्यांची स्वतःची निवडणूक असो किंवा जिल्हापरिषदेचे निवडणूक, त्यांना धनंजय मुंडेंची मदत घ्यावीच लागली , हा मतदारसंघातील सामाजिक समीकरणांचा प्रभाव. अगदी मागच्या जिल्हापरिषद निवडणुकीत तर धनंजय मुंडेंनी पात्रुड येथील सभा घेतलीच पाहिजे यासाठी त्यांच्यात झालेली 'खडाजंगी ' देखील जिल्हा अद्याप विसरला नसेल. म्हणजे भाजपात असो किंवा राष्ट्रवादीत, आ. सोळंकेंच्या राजकारणात त्यांना अडचण वाटली ती मुंडेंचीच आणि राजकारण म्हणून मदत घ्यावी लागली ती देखील कोणत्या ना कोणत्या मुंडेंचीच . आ.प्रकाश सोळंकेंच्या टीकेच्या माऱ्यातून ना दिवंगत गोपीनाथ मुंडे सुटले, ना आज मंत्री असलेल्या पंकजा मुंडे ना त्यांचे स्वपक्षाचे आ. प्रकाश सोळंके. मुंडेंवर टीका करून आणि जमलेच तर 'मुंडें'च्या राजकीय अडचणी वाढवून राजकारण करणे हाच आ. प्रकाश सोळंकेंचा पिंड राहिलेला आहे.
आता देखील विधानसभा निवडणुकीनंतर आ. प्रकाश सोळंके पुन्हा जिल्ह्यात मुंडे बहीण भावावर टीका करत आले आहेत. आ. धनंजय मुंडेंवर तर त्यांच्या टीका जहरी म्हणाव्या अशाच होत राहिल्या आहेत. मात्र एकीकडे असे मुंडे विरोधाचे घोडे दामटत असतानाही 'जिल्ह्यात परळीत झाली तशी महायुती व्हायला हवी होती ,माझी तशी इच्छा होती, पण इतरांनी कोणी साथ दिली नाही , किंबहुना युती होणार नाही असेच पाहिले ' अशी भाषा आज आ. सोळंके बोलत आहेत. म्हणजे एका अर्थाने आजही त्यांना कोणत्या ना कोणत्या मुंडेंच्या 'सहकार्याची ', किमान विरोध होऊ नये अशीच अपेक्षा आहे. मात्र एकाचवेळी विरोधाचा अजेंडा आणि सहकार्याचा हात यांची सांगड घालायची कशी ?

प्रजापत्र | Sunday, 23/11/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
