बीड दि.२२(प्रतिनिधी): परभणीहून धारूरमार्गे पुढे जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, एकाच कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवड फाट्याजवळ घडली आहे. यात पती-पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा समावेश असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेलगावहून केजकडे जात असताना, त्यांच्या ताफ्यातील ऑक्सिजन गाडी (क्र. MH 02 GH 5732) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे. भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला (क्र. MH 44 V 1518) ताफ्यातील ऑक्सिजन टँकर असलेल्या वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे, आणि त्यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.अपघात होताच जखमींना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, त्यांच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

