गडचिरोली : छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील दंडकारण्यात गेल्या अनेक वर्षांपासून 'लाल दहशत' निर्माण करणारा जहाल नक्षल कमांडर हिडमा माडवी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. छत्तीसगड- आंध्रप्रदेश सीमेवरील चकमकीत १८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुरक्षा दलाने सहा माओवाद्यांना कंठस्नान घातले. यात हिडमा माडवी याचा समावेश आहे.
हिडमा माडवी याच्यावर ५०० हून अधिक सुरक्षा जवानांना ठार केल्याचा आरोप आहे. त्याच्या शीरावर पोलिस यंत्रणेने १० कोटींहून अधिक रुपयांचे इनाम ठेवले होते. हिडमा हा अत्यंत आक्रमक माओवादी होता, तो नेतृत्व करीत असलेल्या बटालियन क्र. १ मध्ये १८०० हून अधिक सदस्य आहेत. ते सर्व सदस्य युद्धनीतित निपुण असून, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रेदेखील आहेत.त्याचा खात्मा केल्याने सुरक्षा दलाचे हे सर्वांत मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, १८ नोव्हेंबरला रोजी पहाटे छत्तीसगड- आंध्रप्रदेश सीमेवर माओवादविरोधी अभियान राबविले जात होते, यावेळी माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनी आक्रमक व सुरक्षितपणे माओवाद्यांचा डाव उधळून लावत हिडमा माडवीसह सहा जणांना ठार केले.
१७ व्या वर्षी उचलले शस्त्र
पोलिस सूत्रांनुसार, माओवादी हिडमा याने १९९६-९७ मध्ये दक्षिण बस्तर भागातील सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती येथे त्याचे मूळ गाव. हिदमाल्लू आणि संतोष या दोन नावांनीही त्याची चळवळीत ओळख होती. त्याचे शिक्षण जेमतेत सातवीपर्यंत झाले होते, पण त्यास हिंदी, इंग्रजी भाषा अवगत होती. २००० साली त्याला शास्त्र बनविण्यात प्रशिक्षण देण्यात आले होते. २००१ ते २००७ पर्यंत तो सामान्य सदस्य होता. बस्तरमधील सडवा जुलूम मोहिमेनंतर तो अधिक आक्रमक झाला. २००७ साली बस्तरच्या उरपल मेट्टा चकमकीत २४ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचे नेतृत्व त्यानेच केले होते. त्याला बक्षीस म्हणून २००८ ते २००९ मध्ये माओवाद्यांच्या पहिल्या बटालियनचा कमांडर करण्यात आले.२०१० मध्ये ताडमेटला चकमकीत ७६ जवान शहीद झाले होते, यातही हिडमाने प्रमुख भूमिका बजावली होती.
करेगुट्टा पहाडीवर घेतला होता आश्रय
छत्तीसगडच्या करेगुट्टाच्या पहाडीवर माडवी हिडमा याने जून मध्ये आश्रय घेतला होता. तळपत्या उन्हात पोलिसांनी करेगुट्टा पहाडीला वेढा टाकून मोहीम राबवली होती, पण तो जवानांना हुलकावणी देत निसटला होता. मात्र, अखेर १८ नोव्हेंबर रोजी चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला.

