Advertisement

  संतापजनक! सोन्याचा भयंकर लोभ

प्रजापत्र | Tuesday, 18/11/2025
बातमी शेअर करा

पारनेर : सोन्याच्या हव्यासापोटी रक्ताची नातीही विसरणाऱ्या नराधम नातवाने स्वत:च्या आजीचा खून केला आहे. ही घटना गारगुंडी (ता. पारनेर) येथे रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) दुपारी घडली आहे. या घटनेत ८० वर्षीय आजीचा नातवाने गळा दाबून खून केला आहे. या पाशवी कृत्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मृत आजीचे नाव चंद्रभागा मल्हारी फापाळे असे आहे.

लाखोंचा मुद्देमाल लंंपास केला, खून लपवण्याचा प्रयत्न
या खूनानंतर आरोपींनी चंद्रभागाबाईंच्या अंगावरील सर्व दागिने आणि मोबाईल असा एकूण ₹3,08,000 किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. नातू तेजस शांताराम फापाळे आणि त्याची पत्नी वैष्णवी तेजस फापाळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.या भयानक कृत्याचा खुलासा मृत चंद्रभागाबाईंचा मुलगा पंढरीनाथ मल्हारी फापाळे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीत झाला आहे. रविवारी दुपारी दोन वाजता आजी घरी एकटी असल्याची संधी साधत आरोपी घरात शिरले. सोन्यासाठी गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर मृतदेहावर आढळलेल्या जखमा आरोपींच्या क्रूरतेची साक्ष देतात, असं त्यांनी या फिर्यादीत म्हटलं आहे.

 

सीसीटीव्ही फुटेजने झाला गुन्ह्याचा उलगडा
गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींच्या येण्या–जाण्याचे स्पष्ट फुटेज मिळाले आहे. या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना काळेवाडी परिसरातून अटक केले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले आहे.

 

आरोपी तेजस फापाळेवरचे इतर गुन्हे
पोलिस तपासात उघड झाले की तेजस याच्यावर यापूर्वीच्या सोयाबीन चोरी, ट्रॅक्टर चोरी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे घरातीलच व्यक्ती पाशवी गुन्ह्याला कारणीभूत असल्याचे समजताच गावात संतापाची लाट उसळली आहे.

 

Advertisement

Advertisement