गेवराई दि.३ (प्रतिनिधी):चार महिन्याच्या चिमुकल्या (Crime)मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार (दि.३) रोजी पहाटे ४ च्या सुमारास तलवाडा जवळील रामनगर येथे घडली. पित्याने एवढ्या निर्दयीपणे चिमुकल्याची हत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा जवळील रामनगर येथील अमोल हौसराव सोनवणे व पायल अमोल सोनवणे या पती-पत्नीत चार दिवसांपुर्वी वाद झाला होता. त्यांनी विष प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवार (दि.२) ऑक्टोबर रोजी उपचार घेऊन दोघे घरी परतले होते. आज शुक्रवार (दि.३) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अमोल हौसराव सोनवणे (वय ३०) याने आपल्या चार महिन्याच्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकले. बॅरलमध्ये पाणी असल्याने चिमुकल्याचा मृत्यु झाला. त्यानंतर अमोलने घरासमोरील अंगणात पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी अमोलची पत्नी पायल ही झोपेत होती. सदरील घटना उघडकीस येताच अमोल सोनवणेसह चार महिन्याच्या बाळाला शवविच्छेदनासाठी तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सदरील घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि मनोज निलंगेकर, पोउपनि कैलास अनालदास, बीट अंमलदार पो.ह.शेख मोहसीन, पो.ह. नारायण काकडे, चालक पवन शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान सदरील घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा