बीड दि.(प्रतिनिधी): महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी नुकतेच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत. हे आरोप भाजप आ.सुरेश धसांकडून (Suresh Dhas) केले जात आहे. यावर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज (दि.११) रोजी अजय मुंडेंनी (ajay mundhe)पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी आरोपांचे खंडण केले आहे. तसेच हे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना अजय मुंडे म्हणाले की, राज्यात सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे आरोप लावले गेले आहेत. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे काम सुरू झाले आहे, असं ते यावेळी म्हणाले. तसेच धनंजय मुंडेंच्या आई गावी का गेल्या होत्या, याचा खुलासाही त्यांनी केला आहे.ते म्हणाले की, कारण नसताना धनंजय मुंडेंना बदनाम केले जात आहे. आम्ही सर्व मुंडे कुटुंबीय धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. धनंजय मुंडेंच्या घराचे काम सुरू होते. यामुळे त्यांच्या आई गावातील घरी राहण्यास गेल्या होत्या, असा खुलासाही अजय मुंडेंनी केला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून कार्यकर्ते काही बोलत नाही. देशमुखांना न्याय द्यायचा आहे म्हणून आम्ही गप्प आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
अजय मुंडे पुढे म्हणाले की, खोक्याचा आका कोण आहे? हे देखील आम्हाला माहिती आहे. खोक्याच्या प्रकरणात (Suresh Dhas) सुरेश धस यांनाही सहआरोपी करा. आ.सुरेश धस हे किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे ही आम्हाला माहिती आहे. मस्साजोगची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. पण या प्रकरणाती परळीची नाहक बदनामी केली जात आहे. याचे आम्हाला दु:ख वाटते.माझ्या कुटुंबावर आरोप लावले गेले आहेत. यामुळे आज मी माध्यमांसमोर बोलण्यासाठी आलो आहे. आम्हालाही बोलता येतं पण आम्हाला सनसनाटी निर्माण करायची नाही आहे. खोक्याला धस साधा कार्यकर्ता म्हणतात. पण साधा कार्यकर्ता २०० हरणं कापून खातो. यामुळे धसांनाही आरोपी करा, अशी मागणी अजय मुंडे यांनी केली आहे.