वडीगोद्री दि.३ (प्रतिनिधी): (Patoda)पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा विरुद्ध दिशेने येणाऱ्या उसाच्या बैलगाडीस दुचाकी धडकल्याने मृत्यु झाला. चैतन्य वैद्यनाथ जायभाये (वय २०) रा.काकडहिरा ता. पाटोदा जि. बीड असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर आज सकाळी (दि.३) सातच्या सुमारास वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.
अधिक माहिती अशी (Beed)पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे आज (दि.३) सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा होती. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी चैतन्य आज पहाटे साडेपाच वाजता काकडहिरा येथील (accident)घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर ( क्रमांक एम.एच.२३ बी.डी.५०८८) निघाला. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीसोबत दुचाकीची जोरदार धडक झाली. यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.