समीर लव्हारे
बीड दि.२८-मागच्या अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून (Beed)जिल्ह्याची चर्चा राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुरु आहे.बीड म्हणजे बिहार,बीड म्हणजे गुन्हेगारीचे केंद्र,बीड म्हणजे माफियांचा जिल्हा,बीड म्हणजे गैरकारभाराचा जिल्हा अशी प्रतिमा मागच्या काही काळात प्रसारमाध्यमांनी रंगविली.अजूनही यात खंड पडलेला नसल्यामुळे याचा परिणाम म्हणा किंवा नूतन (Beed sp)एसपींनी अवैध धंदे बंद केल्यामुळे मिळणारी 'मलाई'बंद झाल्याने तब्बल १०७ अधिकाऱ्यांनी विनंती बदलासाठी अर्ज केले आहेत.यात विशेष म्हणजे पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे,स्थानिक गुन्हे शाखेचे उस्मान शेख यांचाही समावेश आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांपेक्षा विनंती स्वरूपात बदल्यांसाठी एवढी मोठी यादी समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील सध्याच्या (Beed)परिस्थिती बाबत आता वेगळं सांगण्याची गरज नाही.मस्साजोगप्रकरणातील खापर फुटले ते पोलीस दलाच्या भूमिकेवरच.अगदी याचमुळे रजेवर असलेल्या पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांचा बळी देखील गेला.घटनेच्या दिवशी आणि आदल्या दिवशीही ते रजेवर होते.मात्र तरी कायदा आणि सुववस्थेच्या जबाबदारीमुळे त्यांची विकेट निघाली.अजूनही त्यांना शासनाने नियुक्ती दिलेली नाही.त्या ठिकाणी पदभार घेतलेल्या नवनीत कॉवत यांनी पहिल्याच दिवशी आपल्या पारदर्शी कारभाराबाबत धोरण जाहीर केले.अवैध धंदे,वाळू माफिया,दारूची तस्करी,गुटखा,मटका यासह कोणत्याच अवैध धंद्यांना सवलत मिळाली तर थेट निलंबन करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.काही ठिकाणी पोलीस अधिक्षकांनी बदल्या आणि तात्पुरते निलंबन करून आपली केवळ घोषणा नसल्याचे सिद्ध देखील केले होते.त्यामुळे आता मात्र अश्या वातावरणात एकीकडून लोकप्रतिनिधीकडून होत असलेली चिखलफेक आणि दुसरीकडून उत्पनाचे स्रोत घटल्यामुळे अधिकाऱ्यांनी वैतागून विनंती बदल्याचा मार्ग निवडला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात तरी आहे.इतिहासात पहिल्यांदाच बीडसारख्या जिल्ह्यातून विनंती बदल्यासाठी तब्बल १०७ अधिकाऱ्यांनी अर्ज केल्यामुळे जिल्हा पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता यातील किती अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि किती अधिकारी जिल्ह्यात राहतात हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे.मात्र पोलीस दलासाठी घडत असलेली बाब चिंतेचा विषय आहे.याचा सर्वांगांनी विचार पोलीस अधिक्षकांनी करण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र आहे.
एलसीबीच्या प्रमुखांनी केला अर्ज
एलसीबी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखासाठी अधिकाऱ्यांची सगळीकडेच जोरदार लॉबिंग असते.एलसीबीला पोलीस अधीक्षकाची शॅडो देखील मानले जाते.त्याच एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी विनंती बदलासाठी अर्ज केल्याचे चित्र राज्यात अपवादात्मक परिस्थिती पाहायला मिळू शकते,यात बीडचा क्रमांक लागला आहे.पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी जिल्ह्यात येऊन वर्ष झाले असेल.त्यांना एलसीबीला नियुक्ती मिळाल्यापासून त्यांच्या नावाची चर्चा सुरूच होती.मस्साजोगप्रकरणात आकाच्या आवडीच्या अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव आ.सुरेश धस यांनी समोर आणले होते.दरम्यान पोलीस अधिक्षक यांनी देखील अवैध धंद्यांवर निर्बंध आणल्यामुळे मग जिल्ह्यात एक एक दिवस वाया तरी का घालवायचा म्हणून विनंती बदली करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आता एलसीबीच्या प्रमुखांचा देखील समावेश झाला आहे.
बीडमध्ये रेकॉर्डब्रेक अर्ज
पोलीस दलातील बदल्यासाठी जिल्ह्यातून डीजीकडे ५९ तर आयजीकडे ४८ अर्ज गेल्याची माहिती आहे.यात सहा विशेष शाखेतील प्रमुखांनी अर्ज केले आहेत.विशेष म्हणजे १० पोलीस निरीक्षक पहिल्यांदाच बदल्यासाठी जिल्ह्यातून अर्ज केल्याचे पाहायला मिळाले.
१५ ठाणेदारांना जिल्हा नको
विनंती बदल्याचे अर्ज केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये १९ पैकी तब्बल १५ ठाणे प्रमुख असल्याची माहिती आहे. बीडच्या चार ही ठाणे प्रमुखांनी अर्ज करून बदल्याची विनंती केली आहे.यात शहर पोलीस ठाण्यातील शीतलकुमार बल्लाळ,शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील मारुती खेडकर,ग्रामीण पोलीस ठाण्यातील शिवाजी बंटेवाड आणि पेठ बीड ठाण्यातून अशोक मुदिराज यांनी अर्ज केल्याचे कळते.
बीडसोबतच,अंबाजोगाई,गेवराई आणि परळीच्या प्रभारींचे अर्ज
बीड शहरातील चारही ठाणे प्रमुखांनी विनंती बदल्यासाठी अर्ज केल्यानंतर परळी ग्रामीणच्या मजहरअली अबुतालीब सय्यद, गेवराई प्रविणकुमार बांगर, अंबाजोगाई विनोद घोळवे या प्रभारींनी देखील विनंती अर्ज केले आहेत. यातील काही अधिकाऱ्यांना बीडमध्ये येवून एक वर्षांचा कालावधी झालेला नाही मात्र तरी त्यांनी अर्ज करत जिल्हा बाहेर बदली मागितली आहे.