पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये (Pune Crime Swargate Bus Depot)एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आरोपीने पीडित तरुणीला खोटं बोलून बसमध्ये चढवलं आणि नंतर दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना अद्यापही आरोपीचा शोध लागलेला नाही.
राज्यातील बस स्थानकांची सुरक्षा आणि इतर मु्द्द्यांवरुन गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील सर्व बस स्थानकांचं ऑडिट करण्यात येणार असून सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत यंत्रणा कामाला लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळासाठी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठीची मागणी गृहमंत्र्यांकडे आम्ही करणार आहोत. याशिवाय एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बस डेपोमध्ये बंद पडलेल्या बसेस उभ्या असतात, त्याचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. त्यामुळे उभ्या बस हटवण्याचे आदेश दिलेले आहेत.''सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही उपोययोजना करता येतील का, एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल, याविषयी बैठकीत चर्चा झाली. राज्यातील सर्व बस स्थानकांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.'' असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.सरनाईक पुढे म्हणाले, स्वारगेट बस स्थानकामध्ये आरोपीची ओळख पटली ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे. स्थानकात चांगल्या प्रकारे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. महामंडळाला आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकेडे करण्यात येणार आहे.