Advertisement

शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावून दीड लाख रुपये लुटले

प्रजापत्र | Monday, 03/02/2025
बातमी शेअर करा

 कडा- चोरट्यांनी घरात प्रवेश करून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावून दीड लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना(Ashti) आष्टी तालुक्यातील शेकडे वस्तीवर रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी अंमळनेर (police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आष्टी (Ashti)तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे कुटुंबासह राहतात. शनिवारी रात्री जेवण करून शेकडे कुटुंब घरात झोपले होते. रविवारी पहाटे २ च्या दरम्यान घराची कडी उघडून चार चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी शेकडे यांना जाग आली असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावला. तसेच आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून धरले. इतर चोरट्यांनी घरात शोधाशोध करत पत्र्याची पेटी ताब्यात घेतली. याचवेळी एका चोराने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोने तोडले, मात्र, शेकडे कुटुंबीयांनी आरडाओरड केला असता सोने तिथेच सोडून घरातील पेटी घेऊन चोरटे पळाले. आवाज ऐकून आलेल्या शेजाऱ्यांनी चोरांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पेटी अर्धा किलोमीटर अंतरावर आढळून आणि. त्यातील दीड लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. ही रक्कम शेती विक्री आणि शेळी, म्हैस विक्रीतून मिळाली होती.

माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशूराम मंजुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक,ठसे तज्ज्ञांनी तपास केला. या प्रकरणी मोहन शंकर शेकडे याच्या फिर्यादीवरून रविवारी अंमळनेर पोलीस ठाण्यात चार चोरट्याविरूध्द कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण करीत आहेत.

Advertisement

Advertisement