Advertisement

शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध झालं तर १ कोटी रुपये देऊ

प्रजापत्र | Monday, 03/02/2025
बातमी शेअर करा

सांगली - अहिल्यानगर येथे झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंचाने घेतलेल्या निर्णयावर संताप व्यक्त करत शिवराज राक्षेने त्यांना लाथ मारली. त्यामुळे शिवराजवर पुढील ३ वर्ष बंदी घालण्यात आली आहे. आता या प्रकरणात शिवराज राक्षे यांच्या प्रशिक्षकांनी खुलं आव्हान दिले आहे. शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध झाल्यास १ कोटी रूपये बक्षिस देऊ असं प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी म्हटलं आहे.

शिवराज राक्षेचे प्रशिक्षक रणधीर पोंगल म्हणाले की, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पूर्व नियोजित होती, कुणाला महाराष्ट्र केसरी बनवायचं हे आधीच ठरले होते. केवळ एकच माणूस हे सर्व करतोय. कुस्तीत एक खांदा खाली टेकलाय त्यावर निर्णय दिला. मी आक्षेप घेतला. रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्थानिक आमदारांनीही व्हिडिओ दाखवण्यास सांगितले तरीही मला व्हिडिओ दाखवला नाही. हे काय सुरू आहे. उडवाउडवी उत्तरे दिली जात होती असा आरोप त्यांनी केला.

तसेच तुम्ही या स्पर्धेचं चित्रिकरण WFI आणि  FILA या आंतरराष्ट्रीय संघटनांना पाठवा आणि कुस्तीचा निर्णय मागवा. जर कुणी म्हटलं शिवराज राक्षे पराभूत झाला तर मी १ कोटीचं चॅलेंज देतो असंही रणधीर पोंगल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवराज जवळपास १६ वर्ष तालीम करतोय. कुस्ती क्षेत्राच्या कारकि‍र्दीत त्याच्या इथून मागच्या कुस्त्या पाहा. जिंकला तरी हुरळून जात नाही आणि पराभव झाला तरी खचून जात नाही. ही कुस्ती आहे. खेळ असल्याने हार जीत होत असते. पराभव पचवण्याचीही ताकद शिवराजमध्ये आहे. मात्र हरलाच नाही. कुस्तीचा Review दाखवला असता, आम्ही पराभूत झालो असतो तर मानलं असते. तुमच्या एका चुकीमुळे हे घडले. सगळं लाईव्ह होते. लाईव्हमध्ये शिवीगाळ झाली त्यामुळे त्याने लाथ मारली. जर अन्याय होऊन शिवीगाळ करत असतील तर कोण सहन करणार असं शिवराजच्या भावाने सांगितले. 

Advertisement

Advertisement