(Gadchiroli) गडचिरोलिच्या भामरागड तालुक्यातील माजी सभापतीची माओवाद्यांनी हत्या केली आहे. सुखराम महागू मडावी (वय ४६) असं हत्या झालेल्या (Panchayat Samiti President)माजी सभापतीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार शनिवार (ता.१) रात्री ११ वाजताच्या सुमारास काही माओवाद्यांनी कियर गाव गाठून सुखराम मडावीला (Crime News) घरातून गावाबाहेर नेले. गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राऊंडवर त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे यावेळी माओवाद्यांनी त्यांचे तोंड बांधून फाशी लावून मारल्याचे बोलले जात आहे.
सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर माओवाद्यांनी पत्रकेदेखील टाकली आहेत. नेमके त्या पत्रकात काय लिहिले आहे आणि हत्येचे कारण काय हे कळू शकले नाही. भामरागड तालुका मुख्यालयापासून कियर हे गाव जेमतेम १२ किलोमीटर अंतरावर असून कोठी पोलिस मदत केंद्रात समाविष्ट आहे.
या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा माओवाद्यांची दहशत निर्माण झाली आहे. सुखराम मडावी यांचा मृतदेह भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला जात असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस विभागानेही या घटनेला दुजोरा दिला असून दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कियर गावात माओवाद्यांनी सुखराम मडावी यांची गळा दाबून हत्या केल्याचे म्हटले आहे.मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात माओवाद्यांनी खोटा आरोप केला आहे की, सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते. त्यांनी परिसरात पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास पोलिसांना मदत केली होती आणि पोलिसांना माहिती पुरवत होते. या वर्षातील माओवाद्यांकडून करण्यात आलेली ही पहिलीच सामान्य नागरिकाची हत्या आहे. गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.