कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले. मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा घोळ संपलेला नाही. सरकार गतिमान नाही. केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करीत आहेत. राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी केली.
त्या म्हणाल्या, महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय नाही. सरकार येऊन ६० दिवस झाले तरी अजूनही सर्व मंत्री कामाला लागलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. केवळ निवडणुकीचा जुमला होता म्हणून वेळे मारून नेऊ नये. पीकविमा, हार्वेस्टरच्या अनुदानातील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेमध्ये विचारणार आहे. याचे पुरावे गोळा करीत आहे.
चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आले..
खासदार सुळे म्हणाल्या, ईव्हीएम यंत्रासंबंधी मतदारांमध्ये संभ्रम आहे. माझी निवडणूकही या यंत्रावर झाली तरी मतदारांचा ईव्हीएमवरील विश्वास उडालेला आहे. कागल, चंदगडमध्ये आता निवडून आलेल्यापेक्षा आमच्या उमेदवार किती तरी पटीने चांगल्या, सुसंस्कृत होत्या. काही तरी करून दाखवण्याची उमेद त्यांच्यामध्ये होती. पण वेगळीच हवा खाऊन आलेले आमदार झाले.
सोन्याची रस्ते व्हायला हवे होते..
महायुतीला कोल्हापूरने चांगले यश दिले. सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत कोल्हापूरचे रस्ते सोन्याचे व्हायला हवे होते. सोन्याचे राहू दे, चांदीचे तरी करा, असाही टोला खासदार सुळे यांनी दिला.