शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेला येत्या दोन दिवसात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सभेने चोख उत्तर दिले जाईल असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलं आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थ आणि मतदार हे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असून त्यांच्याकडून कधीही या गावात विकासाची कामे झाली नव्हती असे सातपुते म्हणाले. उत्तम जानकर यांच्या विरोधात मला पडलेली मते ही माझ्या विकास कामामुळे आणि मोहिते पाटील विरोधामुळे मिळाली असल्याचे सातपुते म्हणाले.
मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा दिवा विजायला आलेला आहे. उत्तम जानकर यांनी राजीनामा देऊन कशावर हवे त्यावर निवडणूक लढवावी, मी लढायला तयार आहे असे आव्हान राम सातपुते यांनी दिलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला आहे. आज जमा झालेली लोक हे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्यावरचे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दूध संघातील असल्याचा टोलाही सातपुते यांनी लगावला.