राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने मारकडवाडी (Markadwadi EVM Protest) येथे येणार आहेत. ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारणारे देशातील मारकडवाडी हे पहिले गाव आहे. या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार आहेत. रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत.
माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा शपथविधी देखील रविवारीच होणार होता. मात्र, त्यांनी आता अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. (Markadwadi EVM Protest)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्यभर चर्चेत आले आहे. कारण या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील केले होते. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील इच्छा मतदान घेताच आले नाही. मात्र, या गावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. मारकडवाडी या ठिकाणी होणारी मतदान प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसेच या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.