'पुष्पा 2' फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती आहे. अभिनेता अल्लू अर्जूनच्या हैदराबाद येथील पुष्पा २ च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेला जीव गमवावा लागला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन आणि इतर अनेकांविरुद्ध संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवारी एका महिलेचा मृत्यू झाला. अल्लू अर्जून पुष्पा २ : द चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता पोहोचला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली, यातून पुढे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली.
अभिनेता अल्लू अर्जून विरोधात गुन्हा दाखल
साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनवर बीएनएस कायद्याच्या कलम 105, 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चिक्कडपल्ली पोलिसांनी सांगितलं की, "आम्ही अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीसीपी अक्षांश यादव यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. यानुसार, अभिनेता अल्लू अर्जुन, 'पुष्पा 2 - द राइज'ची टीम, आणि संध्या थिएटरच्या मालकाविरुद्ध कलम 105, 118 (1) बीएनएस कायद्यांतर्गत 3(5) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. डीसीपी अक्षांश यादव यांनी डेक्कन क्रॉनिकलला यासंदर्भात माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
हैदराबादच्या आरटीसी एक्स रोडवर असलेल्या 'संध्या' सिनेमा हॉलबाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिची दोन मुले जखमी झाली. यानंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हैदराबादमध्ये 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू आणि तिच्या मुलाच्या गंभीर दुखापतीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
अल्लू अर्जूनवर आरोप काय?
संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आणि प्रीमियरमध्ये अल्लू अर्जुनच्या उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मृत महिला आणि तिच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करत आणि त्यांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
मृत महिलेच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. "आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहोत. अर्जुन थिएटरला भेट देणार असल्याची माहिती कोणीही दिली नाही. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नाही", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटुंबियांनी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देत जखमी मुलांच्या उपचाराचा खर्च देण्याची घोषणा करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.