Advertisement

महायुतीत भाजपाच मोठा भाऊ,अजितदादा दोन क्रमांकावर

प्रजापत्र | Tuesday, 03/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरी महायुतीला मुख्यमंत्र्यांची निवड करून नवे सरकार स्थापन करता आलेले नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असून, दुसरीकडे अजित पवार मात्र दिल्लीत तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

 

एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठका थांबल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? किती आमदार मंत्री म्हणून शपथबद्ध होणार? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महायुतीची बैठक होणार नसल्याने अनुत्तरित राहत आहेत. तर दुसरीकडे, भाजपासह महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. तर अजित पवार दिल्लीत आहेत. महायुतीचा सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच छगन भुजबळ यांच्या मागणीमुळे आणि नव्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

महायुतीत भाजपाच मोठा भाऊ, अजितदादा दोन क्रमांकावर

स्ट्राईक रेटनुसार भाजपा एक नंबरवर आहे. तर आम्ही दोन नंबरवर आहोत आणि शिंदेंची शिवसेना तीन नंबरवर आहे. अजित पवारांबरोबर आमची एक बैठक झाली. त्या बैठकीत आम्ही हिशोब केला. आता शिवसेना शिंदे पक्षाला जास्त जागा मिळाल्या त्यांनीही जास्त जागा लढवल्या, त्यामुळे त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या. त्या मानाने आम्हाला जागा मिळाल्या आणि आमचे उमेदवार निवडून आले. स्ट्राईक रेटनुसार आमच्यात दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. मग तुम्ही आम्हाला त्यांच्या बरोबरीने जागा द्या, एवढीच आमची मागणी आहे. यावर आता जे काय आहे ते सर्व नेते बसून निर्णय घेतील. कदाचित आम्हा दोन्ही पक्षांना समान जागा देतील किंवा एखादी जागा कमी जास्त होईल, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.

 

 

दरम्यान, सरकार स्थापन होण्यासाठी वेळ लागत असला तरी अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी काही अडचण निर्माण झालेली नाही. राज्य व्यव्यवस्थित सुरु आहे. सर्व अधिकारी त्यांचे काम पाहत आहेत, असे सांगत अजित पवार गटात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, यावर बोलताना, आता काही जण दोन ते चार वेळा निवडून आलेले आहेत, पण त्यांना मंत्रि‍पदे मिळालेली नाहीत. मग ते म्हणतात की, आम्ही मंत्री कधी होणार? मग काही नवीन आणि जे दोन ते तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांना संधी दिली जाते. हे सर्व पक्षांमध्ये होते, त्यामुळे सर्वच पक्षात जुने आणि नवीन चेहरे दिले जातात, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 
 

Advertisement

Advertisement