महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावी जाऊन पत्रकार परिषद घेतली. शिंदेंच्या नाराजीवर चर्चा रंगली असतानाच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महायुती सरकारमध्ये समन्वयाने काम सुरू असल्याचे सांगितले.
"मी मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन आहे"
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करताना सांगितले की, "मी मुख्यमंत्री आहे, हे फक्त एक पद आहे; पण प्रत्यक्षात मी सामान्य माणूस आहे. लोकांसाठी जे करायला हवे, ते आम्ही करणारच आहोत." तसेच, त्यांनी शेतीसाठी गावी येण्याची ही नेहमीची गोष्ट असल्याचे सांगितले. "माझी गावी शेती आहे, त्यामुळे मी येथे येत असतो. याचा नाराजीनाट्याशी काहीही संबंध नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
"भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठींबा"
मुख्यमंत्री पदाबाबत आणि अन्य निर्णयांबाबत केंद्रीय नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना शिंदे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय अंतिम असेल. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहोत." तसेच, भाजपसोबत असलेल्या महायुतीला प्रचंड यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?
श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाविषयीच्या चर्चांबाबत विचारले असता, शिंदे यांनी हे नाकारले नाही. "सध्या या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही," असे सांगून त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत महायुतीत समन्वय असल्याचा पुनरुच्चार केला. भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी सरकार स्थापन होण्याच्या चर्चांना विराम दिला. महायुती सरकारसाठी त्यांचा विश्वास व समर्पण महत्त्वाचे ठरत असल्याने त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.