विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल हे राज्यासाठी धक्कादायक होते. महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या धक्क्यातून मविआचे नेते सावरलेले दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठीही हे निकाल अतिशय धक्कादायक होते. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. यातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांसह अनेक मनसे नेत्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. मनसेचे मतांची टक्केवारीही घटल्यामुळे पक्षाची मान्यता राहणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगू लागली आहे. या मोठ्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकारी, नेते यांची एक आढावा बैठक घेतली होती.
पराभूत अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; राज ठाकरेंना लिहिले पत्र
विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, असे पत्र राज ठाकरे यांना लिहून अविनाश जाधव यांनी आपला ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पराभूत उमेदवारांची भेट घेतली होती. त्यांच्यात उमेद जागृत केली. ठाणे व मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ८२ उमेदवार, त्यांचे स्थानिक जिल्हाध्यक्ष व अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काही तक्रारी असतील तर त्या लेखी द्याव्यात, असे आवाहन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केले होते. तसेच राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांची विचारपूस केली. त्यांच्या मतदारसंघात काय झाले? मते कमी का मिळाली? काय करण्याची गरज आहे असे वाटते? स्थानिक पदाधिकारी काम करत होते का? तुमच्यासमोर काही अडचणी आहेत का? असे विविध प्रश्न विचारत त्यांनी उमेदवारांना बोलते केले होते.