दिल्ली- शंभराहून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला समोरं जावं लागलं. दिग्गज नेते पराभूत झाले. प्रदेशाध्यक्ष अवघ्या २०८ मतांनी निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला जबर झटका बसला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नाना पटोले दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान, ते राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावर आता नाना पटोले यांनीच खुलासा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ उमेदवार उतरवलेल्या काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर विजय मिळवता आला. विदर्भात काँग्रेसला यशाची आशा होती. पण, त्यांचे स्वप्न भंगले. अनेक वरिष्ठ नेतेच पराभूत झाले. तर काही काठावर विजयी झाले. या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी मौन सोडलं. राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे, असे नाना पटोले यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, "तुम्हाला कोणी सांगितलं? मी आता अध्यक्षांना भेटायला चाललो आहे. आतापर्यंत राजीनामा दिलाच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं?", असा उलट प्रश्न उपस्थित करत नाना पटोलेंनी उत्तर दिले.