मागच्या वर्ष दीड वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा जबरदस्त प्रभाव लोकसभा निवडणुकीत पडला होता. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीची लोकसभेच्या निकालात मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची नाराजी महायुतीला भोवणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र निकालांमध्ये महायुतीने राज्यातील इतर भागांबरोबरच जरांगेंचं प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यातही जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे जरांगे फॅक्टर या निवडणकीत फेल गेल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर आता स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे आम्ही मैदानातच नव्हतो, तरी तुम्ही आम्हाला फेल म्हणता. कोण निवडून आला आणि कोण पडला, याचं आम्हाला सोयर सुतकच नाही, असं मनोज जरांहे पाटील यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काल एक गोष्ट चालली की जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नव्हतो, तरी तुम्ही आम्हाला फेल म्हणता. कोण निवडून आला आणि कोण पडला, याचं आम्हाला सोयर सुतकच नाही. आम्ही मैदानात नसल्याने आम्हाला निकालांचं काही सोयर सुतकच नाही. स्वत: मोठ मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं की हा आमच्यामुळे निवडून आलाय, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत जेवढे उमेदवार निवडून आले आहेत त्यांच्या मागे पूर्णच्या पूर्ण फॅक्टर हा मराठ्यांचा आहे. मराठ्यांच्या जीवावर निवडून आलो नाही, असं एखाद्या आमदारानं म्हणून दाखवावं. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पूर्ण हयात जाईल, तरी तो तुम्हाला कळणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
यावेळी विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव पडला असा दावा करणाऱ्या काही समाजांच्या नेत्यांनाही जरांगे पाटील यांनी नाव न घेता टोला लगावला. कुठल्याही घटकानं श्रेय घेताना किमान आपली औकात पाहिली पाहिजे. उगाच लोकांच्या जत्रेत जायचं आणि हे आमच्या फॅक्टरनं केलं म्हणायचं बंद केलं पाहिजे. तुमची औकात तुमची उडी कुठपर्यंत कुठपर्यंत आहे हे लोकांना कळतं, असे जरांगे पाटील म्हणाले.