सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे आणि शिवसेनेचे (उबाठा) उपनेते शरद कोळींवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत आले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी माध्यमांना जाहीरपणे माहिती देताना सांगितले की, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवसेनेने गडबड केली आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ स्वतःकडे ठेवला. दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी स्पष्टपणे सांगितले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील हे मतदानाच्या दिवशीच अडचणीत आले आहेत. यामुळे शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी चांगलेच संतापले होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान माजी आमदार उत्तप्रकाश खंदारे आणि उपनेते शरद कोळी यांनी पत्रकार भवनाजवळील पक्षाच्या कार्यालयाजवळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. त्यावेळी महाविकास आघाडीचा धर्म न पाळल्याने शिवसैनिक संतप्त झाल्याच्या घोषणा देण्यात आल्या.